Delhi Excise Policy Case: आज राष्ट्रीय राजकारणात एक मोठी घटना घडली आहे. दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आज (21 मार्च) अटक करण्यात आली आहे. सायंकाळीच ED चे पथक केजरीवालांनी निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी त्यांची चौकशी आणि घराची झाडाझडतीही घेण्यात आली. दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवालांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवालांना आतापर्यंत चौकशीसाठी नऊ समन्स बजावले, मात्र ते एकदाही हजर झाले नाही. अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी केजरीवालांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर आज अचानक ईडीचे पथक केजरीवालांच्या घरी दाखल झाले. यावेळी केजरीवालांची त्यांच्या घरात दोन तास चौकशी झाली आणि चौकशीनंतर ईडीची टीम केजरीवालांना ताब्यात घेतले. उद्या त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
'केजरीवाल राजीनामा देणार नाहीत'अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की ते (केजरीवाल) मुख्यमंत्रिपदावर कायम राहतील, ते राजीनामा देणार नाही. मंत्री आतिशी म्हणाल्या की, केजरीवाल मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील. तसेच, या अटकेविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, केजरीवालांच्या अटकेनंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत.
प्रियंका गांधी यांची प्रतिक्रियासीएम केजरीवाल यांच्या अटकेनंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी याला असंवैधानिक म्हटले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याविरोधात पोस्ट केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अशा प्रकारे टार्गेट करणे चुकीचे आणि घटनाबाह्य आहे. अशा प्रकारे राजकारणाची पातळी कमी करणे ना पंतप्रधानांना शोभते, ना त्यांच्या सरकारला, अशी टीका त्यांनी केली.