Maharashtra Politics ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक निकालानंतर आज एनडीएतील खासदारांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ही बैठक पार पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीला अपयशाचा सामना करावा लागला. मागील निवडणुकीत महाराष्ट्रात ४१ जागा जिंकणाऱ्या महायुतीला यंदा मात्र अवघ्या १७ जागांवर समाधान मानावं लागलं. तर दुसरीकडे, विरोधकांच्या महाविकास आघाडीने तब्बल ३० जागांवर विजय मिळवला. त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला नेमक्या कोणत्या मुद्द्यांमुळे फटका बसला, यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांकडून मंथन सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा ताकद निर्माण करून महायुतीला भरारी घेण्यासाठी काय रणनीती आखावी लागेल, यावरही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
फडणवीस निर्णय मागे घेणार?
राज्यातील महायुती सरकारमधून मुक्त होऊन पक्षामध्ये पू्र्णवेळ काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपश्रेष्ठींना केली आहे. याबाबतच सविस्तर चर्चा करण्यासाठी काल सायंकाळी ते नागपूरमधून दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील सत्ताधारी महायुतीच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा त्याग करण्याची इच्छा केली आहे. मात्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहावं, अशी विनंती महायुतीच्या विविध नेत्यांकडून केली जात आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील फडणवीस यांना याबाबतची विनंती करू शकतात.