Election Commission ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आज जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरमधील निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर हरियाणातील निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून १ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि ४ ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांतील मतमोजणी करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, "जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर निवडणुका होणार असून एकूण ९० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जम्मूतील ४३ आणि काश्मीरमधील ४७ जागांचा समावेश असणार आहे. निवडणूक आयोगाने जम्मूमधील सांबा, कठुआ, राजौरी, किश्तवाड, डोडा आणि उधमपूर या भागातील एक-एक जागा वाढवण्यात आली असून काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एक विधानसभा मतदारसंघ वाढवण्यात आला आहे," अशी माहिती कुमार यांनी दिली आहे.