नवी दिल्ली: सरकारी नोकरीबाबत केंद्रातील मोदी सरकारने देशातील तरुणांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना येत्या 18 महिन्यांत 10 लाख भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. विरोधी पक्ष सातत्याने देशातील बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरत आहेत, यातच ही घोषणा झाल्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 'पंतप्रधानांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधनाच्या स्थितीचा आढावा घेतला असून, सरकारने पुढील 1.5 वर्षांत 10 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत,' अशी माहिती ट्विटमधून देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या वर्षाच्या सुरुवातीला संसदेत सांगितले होते की, 1 मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 8.72 लाख पदे रिक्त आहेत. आता हीदेखील पदे भरण्यात येतील, अशी आशा आहे.
केंद्रातील या विभागांमध्ये बहुतांश पदे रिक्त मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेमध्ये सुमारे 15 लाख मंजूर पदांपैकी सुमारे 2.3 लाख पदे रिक्त आहेत. संरक्षण (नागरी) विभागात सुमारे 6.33 लाख कर्मचाऱ्यांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत सुमारे 2.5 लाख पदे रिक्त आहेत. पोस्ट विभागामध्ये एकूण मंजूर 2.67 लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुमारे 90,000 जागा रिक्त आहेत, तर महसूल विभागात, 1.78 लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुमारे 74,000 रिक्त पदे आहेत आणि गृह मंत्रालयात मंजूर 10.8 लाख पदांपैकी सुमारे 1.3 लाख पदे रिक्त आहेत.
पंतप्रधानांच्या या घोषणेची काँग्रेसने उडवली खिल्ली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील दीड वर्षात 10 लाख तरुणांची भरती करण्याची घोषणा तरुणांमध्ये नवीन आशा आणि आत्मविश्वास आणेल. दरम्यान, पंतप्रधानांच्या घोषणेची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, "बिली 900 उंदीर खाऊन हजला गेली", अशी टीका त्यांनी केली. 50 वर्षातील सर्वात वाईट रोजगार (दर) आपण अनुभवत आहोत, रुपयाचे मूल्य 75 वर्षातील सर्वात कमी आहे. पंतप्रधान कधीपर्यंत 'ट्विटर ट्विटर' खेळून आमचे लक्ष विचलित करणार आहेत, असेही ते म्हणाले.