Lalkrushan Advani Bharat Ratna 2024 ( Marathi News ) : भाजप नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट लिहीत माहिती दिली आहे. तसंच हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदनही केलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, "श्री. लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान होत असल्याने मी खूप खूश आहे. मी त्यांच्याशी बोलून हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. ते आपल्या काळातील सर्वाधिक आदर असणारे राजकीय नेते असून भारताच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. तळागाळात काम करण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास देशाच्या उपपंतप्रधान होण्यापर्यंत पोहोचला. त्यांनी देशाचे गृहमंत्री व माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. अडवाणी यांची संसदीय कारकीर्दही समृद्ध राहिलेली आहे," अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
दरम्यान, देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदन करण्यात येत आहे.