संसदेत पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेस आणि बीआरएसने मोदी सरकारविरोधात दोन वेगवेगळ्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या होत्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रस्तावाची नोटीस मंजूर केली आहे.
जनतेचा सरकारवरील विश्वासाला तडा जात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदींनी मणिपूरवर बोलावे अशी आमची इच्छा आहे, पण ते ऐकत नाहीत, म्हणून आम्ही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाची सूचना लोकसभेत मंजूर झाली आहे. प्रस्तावाच्या सूचनेला सभागृहातील आवश्यक 50 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी सकाळी ९.२० वाजता लोकसभेत महासचिवांच्या कार्यालयात अविश्वास प्रस्तावाची सूचना दिली होती.
मणिपूरमध्ये ३ मेपासून हिंसाचार सुरूच आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनात गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींनी बोलण्यासाठी आणि या मुद्द्यावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तरानुसार सरकार चर्चेसाठी तयार आहे. मात्र मोदी बोलायला तयार नाहीएत. यामुळे विरोधात या मुद्द्यावर ठाम राहिले आहेत.