भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असलेले भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत महत्वाची अपडेट आली आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधात ज्या अल्पवयीन महिला कुस्तीपटूने आरोप केले होते ते तिने मागे घेतले आहेत. बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांनी सोमवारीच आंदोलन सोडून रेल्वेच्या नोकरीवर जाणे पसंत केले होते. त्यानंतरची ही सर्वात मोठी अपडेट आहे.
ब्रिजभूषण यांच्याविरोधात सात महिला पैलवानांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यात एक अल्पवयीन पैलवानही होती. यावरून कारवाई होत नसल्याने गेल्या महिनाभरापासून रेसलर्सनी दिल्लीत आंदोलन सुरु केले होते. आरोप प्रत्यारोप होत होते. परंतू कारवाई काही पुढे जात नव्हती. अखेर शेतकरी संघटना, खाप पंचायतींचा पाठिंबा मिळू लागल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंदोलकांना भेटीला बोलावले होते. या बैठकीनंतर लगेचच तिन महत्वाचे पैलवान आंदोलन सोडून नोकरीवर परतले होते. पुन्हा आंदोलन कधी होणार, काय होणार आदी कशाचीच माहिती दिली जात नव्हती.
या साऱ्या अनिश्चिततेवर आज या खटल्यातील सर्वात महत्वाचे ठरू शकणाऱ्या अल्पवयीन रेसलरने मॅजिस्ट्रेटसमोर दुसरा जबाब नोंदविला आहे. यामध्ये तिने ब्रिजभूषण यांच्यावरील आरोप मागे घेतले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. या महिला रेसलरने एक जबाब पोलिसांकडे तर दुसरा मॅजिस्ट्रेटकडे नोंदविला आहे. आता या १७ वर्षीय पैलवानाने ते बदलले आहे. अल्पवयीन असल्याने तिचा हा जबाब कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. आता तिनेच आपला जबाब बदलल्याने या प्रकरणात मोठे वळण आले आहे.
मॅजिस्ट्रेटसमोर अल्पवयीन पैलवानाने जबाब बदलल्याने आता न्यायालयाच या आरोपांवर पुढे जायचे की नाही ते ठरविणार आहे. या पैलवानाच्या वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीय. तिने १० मे रोजी पहिला जबाब नोंदविला होता. यामध्ये ब्रिजभूषण यांनी फोटो काढण्याच्या बहाण्याने तिला जोरात पकडले होते आणि आपल्याकडे खेचले होते. खांदे देखील दाबले होते आणि नंतर तिच्या छातीवरून मुद्दामहून हात फिरवले होते, असा आरोप तिने केला होता.