मोठी बातमी! आता सर्व भाविकांना चारधाम यात्रेला जाता येणार, कोर्टाकडून मिळाली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 12:44 PM2021-10-05T12:44:12+5:302021-10-05T12:44:19+5:30
न्यायालयाने आरोग्याच्या दृष्टीने सर्व वैद्यकीय व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
नैनीताल: चार धाम यात्रेच्या बाबतीत उत्तराखंड सरकारला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मर्यादित संख्येने यात्रेकरुंना देवस्थानांमध्ये प्रवेश देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. आता सर्व भाविकांना केदारनाथ आणि बद्रीनाथ धामला जाता येणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी न्यायालयाने उत्तराखंड सरकारला आरोग्याच्या दृष्टीने सर्व वैद्यकीय व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
सरकारने दाखल केला होता अर्ज
तीन आठवड्यांपूर्वी उच्च न्यायालयाने चार धाम यात्रेला सशर्त मंजुरी देताना केदारनाथमध्ये केवळ 800, बद्रीनाथमध्ये 1000, गंगोत्रीमध्ये 600 आणि यमुनोत्रीमध्ये 400 भाविकांना एका दिवसात दर्शनासाठी परवानगी देण्याची व्यवस्था केली होती. तेव्हापासून भाविक दर्शनासाठी जात होते, पण अनेकांना दर्शनासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि भाविकांच्या मागणीनुसार सरकारने गुरुवारी प्रतिज्ञापत्र दाखल करुन प्रवाशांच्या संख्येची मर्यादा वाढवण्याची विनंती केली होती.
या भाविकांना निगेटिव्ह रिपोर्ट द्यावी लागेल
चार धाम यात्रेसाठी देशभरातून यात्रेकरू येतात. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल देण्याची गरज नाही. पण, सोमवारी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही बदल करुन केरळ, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या यात्रेकरुंना लसीकरणाचे प्रमाणपत्रासह निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आली आहे.