नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने आपल्या 13 लाख कर्मचार्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. रेल्वेने कर्मचार्यांच्या सोयीसाठी आता डिजिटल ऑनलाईन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) सुरू केली आहे. या सुविधेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्स मॉड्यूलद्वारे त्यांचे पीएफ बॅलेन्स चेक करता येणार आहे. याशिवाय त्यांना अॅडव्हान्स पीएफसाठी ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. (Indian Railway)
रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, की सुधारित उत्पादकता आणि कर्मचार्यांना फायदा मिळवून देण्यासाठी भारतीय रेल्वेने एचआरएमएस हा एक खास प्रकल्प सुरू केला आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने, रेल्वे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त एचआरएमएस (HRMS) आणि यूझर डेपोची मॉड्यूल्स लॉन्च करण्यात आले आहेत. यात कर्मचारी सेल्फ सर्व्हिसचा (ESS) लाभ घेऊ शकतात.
या सुविधेत भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अॅडव्हान्स मॉड्यूलदेखील आहे. यात कर्मचारी त्यांचा पीएफ तपासू शकतात आणि पीएफ अॅडव्हान्ससाठी ऑनलाईन अर्जही करू शकतात. ही सर्व प्रकिया ऑनलाईन पद्धतीने होईल. याशिवाय कर्मचारी त्यांच्या पीएफ अर्जाची स्थितीही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत.
याशिवाय, यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सेटलमेंट मॉड्यूलही तयार केले आहे. यात सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या संपूर्ण सेटलमेंट प्रक्रियेचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे.