Devendra Fadnavis ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आलेल्या अपयशानंतर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. फडणवीस यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी महायुतीच्या नेत्यांकडून केली जात आहे. मात्र फडणवीस हे या निर्णयावर ठाम असून त्यांनी नुकतीच भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता फडणवीस यांचा सरकारमधून दूर होण्याचा निर्णय लांबवणीवर पडल्याचे समजते.
एनडीएला लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी अद्याप नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झालेला नाही. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आपण महाराष्ट्रातील स्थितीवर सविस्तर चर्चा करू, तोपर्यंत तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून तुमचं काम सुरू ठेवा, असा सल्ला अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे किमान पुढील काही दिवस तरी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देता येणार नाही.
महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला. मागील निवडणुकीत ४१ जागा जिंकणाऱ्या युतीला यंदा मात्र १७ जागांपर्यंतच मजल मारता आली. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना बळकट करण्यासाठी सरकारमधील जबाबदारीतून मुक्त होऊ इच्छितो, अशी इच्छा फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे. मात्र फडणवीसांच्या या निर्णयाला भाजपचं केंद्रीय नेतृत्व सहमती देणार की नाही, याबाबत आता आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
"महाराष्ट्रातील स्थिती सुधारण्यासाठी लवकरच उपाययोजना करू"
लोकसभेच्या तब्बल ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात झालेली पिछेहाट भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे आजच्या फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत अमित शाह यांनी राज्यातील स्थिती सुधारण्यासाठी आपण लवकरच शक्य असतील त्या उपाययोजना करू, असा शब्द दिल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला नवसंजीवनी देण्यासाठी आगामी काळात पक्षनेतृत्वाकडून नेमके कोणते फेरबदल केले जाता, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातील ३ मोठ्या नेत्यांचे दिल्लीत विचारमंथन
राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांच्या उपस्थितीत काही वेळापूर्वी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाल्याची माहिती आहे. या निवडणुकीत आपल्याला नेमक्या कोणत्या मुद्द्यांमुळे फटका बसला, यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांकडून मंथन केले गेले. राज्यात पुन्हा ताकद निर्माण करून महायुतीला भरारी घेण्यासाठी काय रणनीती आखावी लागेल, यावरही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चर्चा केली गेल्याचं सांगितलं जात आहे.