सीरम इन्स्टिट्यूटने ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी दिली आहे. लहान मुलांसाठी बनविण्यात आलेली कोरोना लस कोवोवॅक्सला WHO ने मंजुरी दिली आहे. कोवोवॅक्सच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली असून 12 वर्षे ते 17 वर्षे वयाच्या मुलांना ही लस देण्यास लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या नोवावॅक्सकडून ही लस सीरमने कराराद्वारे उत्पादित केली आहे. कोवॅक्स प्रोग्रॅमनुसार ती जगभरात पाठविली जाणार आहे. कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी ही मोठी गोष्ट असून कोरोना लढ्याला मोठे बळ मिळणार असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिअंट पसरू लागला असून कोरोना लढ्यात लहान मुलांना वाचविण्यासाठी त्यांना ताकदवर बनविण्यासाठी मोठे यश आले असल्याचे डब्ल्यूएचओचे लस विभागाचे प्रमुख मारिंगेला सिमाओ यांनी म्हटले आहे.
जगात असे 41 देश आहेत ज्याना अद्याप 10 टक्के लोकांचे लसीकरण करता आलेले नाही. त्यांच्याकडे लस विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. तर 98 देश 40 टक्के देखील लोकसंख्येचे लसीकरण करू शकलेले नाहीत.
भारत सरकारकडे परवानगी मागितली
सीरमने मुलांसाठीच्या या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारकडे अर्ज केला आहे. डब्ल्यूएचओने परवानगी दिल्याने आता सरकारची परवानगी देखील लवकरच मिळण्याची शक्यता आहे. असे जाल्यास नववर्षाच्या सुरुवातीलाच मुलांचे लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे.