अमृतसर : पंजाबमधील मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासोबत झालेल्या तीव्र मतभेदानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले नवज्योतसिंग सिद्धू हे सुमारे वर्षभर राजकारणात फारसे सक्रिय नव्हते; पण आता काँग्रेसने त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले असून, पक्षात त्यांना मोठे स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. सिद्धू यांनी आपल्या पक्षात यावे म्हणून शिरोमणी अकाली दल व भाजपनेही त्यांना निमंत्रण दिले आहे.
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर पंजाबमधील काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी स्थानिक स्वराज्य संस्था खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यक्रमांतही ते फारसे दिसत नव्हते. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेती बचाव यात्रा काढण्यात आली. त्यात नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलेल्या भाषणाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या यात्रेत सिद्धू यांनी सामील व्हावे यासाठी मनधरणी करण्याकरिता काँग्रेसचे पंजाबचे प्रभारी हरीश रावत हे त्यांच्या घरी गेले होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रावत यांनी सिद्धू यांच्याबरोबर न्याहारीदेखील केली. सिद्धू यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याबाबत हरीश रावत यांनी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशीही चर्चा केली आहे.
लोकप्रियतेचा फायदा घेण्याची रणनीतीनवज्योतसिंग सिद्धू हे पंजाबमधील जनतेत लोकप्रिय आहेत. काँग्रेसमधील या नाराज नेत्याला आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी भाजप व शिरोमणी अकाली दल, हे दोन्ही पक्ष उत्सुक आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या लोकप्रियतेचा राजकीय फायदा घेण्याचा या दोन्ही पक्षांचा विचार आहे. मात्र, सिद्धू यांनी काँग्रेस पक्षातच राहावे यासाठी चाललेले प्रयत्न फलद्रूप होण्याची शक्यता अधिक आहे.