ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.१८ - आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटचे सहकारी कुमार विश्वास लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले असून त्याच पार्श्वभूमीवर विश्वास यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि विश्वास यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशची निवडणूक तोंडावर आल्याने या निर्णयासाठी फारसा वेळ घालवता येणार नाही. कुमार विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहांची भेट घेऊन लवकरच हा निर्णय जाहीर करतील असे समजते.
'आप'द्वारे अमेठीतून राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्याविरोतलोकसभा निवडणूक लढवणारे विश्वास आता गाझियाबादमधील साहिदाबाद येथून लढण्यास उत्सुक आहेत. मात्र गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशातील भाजपाचे महासचिव पंकज सिंग यांचाही या (साहिदाबाद) जागेवर डोळा असून पक्षातील नेते दोन्ही उमेदवारांबाबत गंभीरपणे विचार करत आहेत. उत्तर प्रदेशमधील राजकारणात गेल्या दशकभरापासून सक्रिय असलेल्या सिंग यांना अमित शहा यांनी अपेक्षाभंग होऊ न देण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांना कोणत्या जागेवरून निवडणूक लढवता येईल, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.