काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; बघेल पंजाबचे नवे प्रभारी, अजय लल्लू यांना प्रमोशन, तर बिहारमध्ये सरप्राइज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 00:12 IST2025-02-15T00:12:19+5:302025-02-15T00:12:51+5:30
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी एकूण तेरा राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन प्रभारी नियुक्त केले आहेत.

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; बघेल पंजाबचे नवे प्रभारी, अजय लल्लू यांना प्रमोशन, तर बिहारमध्ये सरप्राइज
काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेसने अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना नवीन सरचिटणीस आणि प्रभारी म्हणून जबाबदाऱ्या दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी एकूण तेरा राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन प्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाने बिहार, पंजाब आणि मध्य प्रदेश आदी १३ राज्यांमध्ये नवीन प्रभारी नियुक्त केले आहेत.
भूपेश बघेल पंजाबचे नवे प्रभारी -
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करताना, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची पंजाबचे तर राज्यसभा खासदार नासिर हुसेन यांची जम्मू-काश्मीर आणि लडाखचे प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांना राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे आणि त्यांना ओडिशाचे प्रभारी बनवण्यात आले आहे.
बिहारमध्ये सरप्राइज -
या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने कृष्णा अलावरू यांना बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे, ते आतापर्यंत युवक काँग्रेसचे प्रभारी होते. कर्नाटकचे ज्येष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांना हरियाणाचे प्रभारी आणि राजस्थानचे ज्येष्ठ नेते हरीश चौधरी यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. मीनाक्षी नटराजन यांना तेलंगणाचे प्रभारी बनवण्यात आले. रजनी पाटील यांना हिमाचल प्रदेश, चंदीगडचे प्रभारी बनवण्यात आले आहे. राजीव शुक्ला यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, के. राजू यांना झारखंडचे प्रभारी बनवण्यात आले आहे.
Hon'ble Congress President Shri @kharge has appointed the following party functionaries as AICC General Secretaries/In-charges of the respective States/UTs, with immediate effect. pic.twitter.com/zl8Y0eP5ZM
— Congress (@INCIndia) February 14, 2025
ओडिशाचे खासदार सप्तगिरी उलाका यांना मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम आणि नागालँडचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तसेच, गिरीश चोडणकर यांना तामिळनाडू आणि पुद्दुचेरीचे प्रभारी बनवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने राजीव शुक्ला, मोहन प्रकाश, देवेंद्र यादव, अजय कुमार, दीपक बाबरिया आणि भरतसिंग सोलंकी यांना राज्य प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले. तसेच, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी (१३ फेब्रुवारी २०२५) माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.