बंगळुरूमध्ये रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी स्फोट झाला होता. या प्रकरणी एनआयएने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. १ मार्च रोजी दुपारी १२.५६ वाजता झालेल्या कॅफे बॉम्बस्फोटातील एक संशयित स्फोटानंतर जवळपास आठ तासांनंतर रात्री ८.५८ वाजता बल्लारी बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. बुधवार, ६ मार्च रोजी, स्फोटानंतर पाच दिवसांनी, एनआयएने बल्लारी येथील 'ISIS मॉड्यूल'मधून चार जणांना ताब्यात घेतले.
राहुल गांधी यांची नवी रणनीती; विजयश्री खेचण्यासाठी युती जास्त, जागा कमी, काँग्रेस लढवणार ३०० जागा
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मिनाज उर्फ मोहम्मद सुलेमान, २६, अनस इक्बाल शेख, २३, शायन रहमान उर्फ हुसेन, २६ तर १९ वर्षीय सय्यद समीरला चौकशीसाठी तीन दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कॅफे स्फोटातील संशयित, या आरोपीचा पलायनाचा मार्ग सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोधण्यात आला होता, तो दोन आंतरराज्य सरकारी बसेसमधून बल्लारी आणि अन्य अज्ञात ठिकाणी गेल्याचे दिसत आहे.
संशयिताने पलायन केलेल्या मार्गाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो कॅफेच्या अगदी जवळ असलेल्या बस स्टॉपवरून व्होल्वो बस (KA 47 F 4517) मध्ये चढताना दिसतो. संशयिताने कॅफेपासून सुमारे ३ किमी दूर कपडे बदलले, तिथे त्याने घातलेली बेसबॉल कॅप आणि शर्ट काढला आणि कॅज्युअल टी-शर्टमध्ये बदलला.
घटनास्थळावरून बेसबॉल कॅप जप्त करण्यात आली असून हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटाच्या दिवशी दुपारी ३ च्या सुमारास बेंगळुरूच्या बाहेरून शहरापासून ६० किमी अंतरावर असलेल्या तुमकूरला निघालेल्या सरकारी बसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित देखील दिसला. बसमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात टोपीशिवाय आणि नवीन कपड्यातील संशयितांचे फोटो कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तुमकूरला जाताना तो बसमधून खाली उतरल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.