भाजपाच्या पराभवासाठी केलेला मोठा त्यागही कमीच पडेल- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 06:36 AM2019-03-13T06:36:16+5:302019-03-13T06:36:45+5:30
संघ व भाजपच्या फॅसिझम, राग, विद्वेष पसरविणाऱ्या तसेच भेदभाव करणाऱ्या विचारसरणीचा पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी कितीही मोठा त्याग केला तरी तो कमीच पडेल, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी येथे केले.
अहमदाबाद : रा. स्व. संघ व भाजपच्या फॅसिझम, राग, विद्वेष पसरविणाऱ्या तसेच भेदभाव करणाऱ्या विचारसरणीचा पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी कितीही मोठा त्याग केला तरी तो कमीच पडेल, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी येथे केले.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही उपस्थित होत्या. भाजपाचा पाडाव करण्यासाठी महत्त्वाच्या राज्यांत कोणत्या पक्षांबरोबर आघाडी करावी हे ठरविण्याचे सर्वाधिकार कार्यकारिणी राहुल गांधींना दिले. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहून, कार्यकारिणीच्या बैठकीला प्रारंभ झाला. त्याआधी काँग्रेस नेत्यांनी साबरमती आश्रमात जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर होणारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. गुजरातमध्ये तब्बल ५८ वर्षांनंतर या पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. याआधी अशी बैठक १९६१ साली भावनगरमध्ये पार पडली होती.
ही लढाई आम्ही जिंकूच
काँग्रेस कार्यकारिणीच्या सरदार पटेल राष्ट्रीय स्मारकामध्ये आयोजिलेल्या बैठकीत ते म्हणाले की, विद्वेषी प्रवृत्तींचा पराभव करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. गांधीजींनी काढलेल्या दांडी यात्रेच्या वर्धापनदिनी काँग्रेसने हा पण केला आहे. ही लढाई आम्ही जिंकूच असे राहुल गांधी म्हणाले.
मोदींमुळे जनता पीडित : सोनिया गांधी
पंतप्रधान मोदी स्वत: पीडित असल्याचे भासवतात. प्रत्यक्षात त्यांच्या धोरणामुळे जनताच पीडित आहे अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. त्या म्हणाल्या की, राष्ट्रहिताशी निगडीत मुद्द्यांवर भाजपा राजकारण करत आहे. ही अतिशय चुकीची कृती आहे.
अर्थव्यवस्थेला घरघर
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हणाले आहे की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. प्रत्येक बाबतीत मोदी सरकार खोटा प्रचार करत आहे. यूपीए सरकारने ज्या उत्तम योजना राबविल्या होत्या त्यांची माहिती जनतेला पुन्हा सांगणे आवश्यक आहे. मोदींच्या कारकीर्दीत देशाची पिछेहाट झाल्याचेही ते म्हणाले.