NCP Ajit Pawar Group And Sharad Pawar: काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बंडखोरी करत सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेली. मात्र, यातच आता केवळ महाराष्ट्र नाही तर आणखी एका राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला असून, सर्वच्या सर्व ७ आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून भाजपसोबत सत्तेत गेले आहेत. राष्ट्रवादीकडे मंत्रिमंडळातील अर्थ, सहकार आणि कृषीसारखी महत्त्वाची खाती आहेत. यातच अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ आमदार एका राज्यात निवडून आले होते. या सर्व आमदारांनी अजित पवार यांना समर्थन देत असल्याचे जाहीर केले आहे.
कोणत्या आमदारांनी दिला अजित पवारांना पाठिंबा?
एकीकडे महाराष्ट्रामध्ये झालेल्या या राजकीय भूकंपानंतर नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसनेही अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. नागालँडमध्ये निवडून आलेल्या सर्व ७ आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याामुळे अजित पवार गटाची ताकद आणखीन वाढली आहे. नागालँडची विधानसभा निवडणूक आताच पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादीला सात जागांवर यश मिळाले होते. नामरी नचांग, पिक्टो, एस. तोइहो येप्थो, वाय. म्होंबेमो हूमत्सो, वाय. मानखा ओकोन्याक, ए पोंगशी फोम आणि पी लॉन्गॉन या राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. या सर्वांनी एक परिपत्रक काढून अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, नागालँडमध्ये वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला ३७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले होते. एनडीपीपीला २५ आणि भाजपला १२ जागांवर यश मिळाले. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीपीपी-भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे ७ आमदार निवडून आले आहेत.