Punjab Congress Fight: पंजाबमध्ये राजकीय दंगल थांबण्याचे नाव घेत नाहीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंगांनी (Amrinder Singh) मोठी घोषणा केली आहे. यापुढे मी काँग्रेस पक्षात राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (I will left congress; Amrinder Singh talk about AAP and BJP.)
अमरिंदर सिंगांनी सांगितले की, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. अशाप्रकारचा अपमान मी सहन करणार नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये मला वागणूक मिळाली ती योग्य नाही. सध्यातरी मी भाजपामध्ये जात नाहीय. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले की, ज्या पद्धतीने आमदारांची बैठक बोलवून एनवेळी मला माहिती दिली गेली, मी तेव्हाच पद सोडत असल्याचे स्पष्ट केले होते. जर कोणाला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या पदावर असण्याचा काय फायदा, असे ते म्हणाले. नवज्योत सिंग सिद्धूवर त्यांनी टिपण्णी करताना म्हटले की, सिद्धू टीम प्लेअर नाहीय. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी टीम प्लेअरची गरज आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसची लोकप्रियता घटत आहे हे मी स्वीकार करतो, तिथे आपची लोकप्रियता वाढू लागली आहे. यावेळची पंजाब निवडणूक खूप वेगळी असणार आहे. कांग्रेस-अकाली दल पहिल्यापासूनच इथे आहेत. आता आम आदमी पार्टीदेखील वाढू लागली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंगांनी शाहांनंतर घेतली डोवालांची भेटअमरिंदर सिंगांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंह सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. खरेतर कॅप्टन हे मंगळवारीच अमित शहांच्या भेटीला जाणार होते. परंतू तेवढ्यातच सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने एक दिवस उशिरा शाहांची भेट घेण्याचा निर्णय कॅप्टननी घेतला. पंजाबमध्ये सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले होते. विरोधी आमदारांना गोळा करून त्यांनी कॅप्टनना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लावले होते. तेव्हा कॅप्टननी सिद्धू यांचे पाकिस्तानशी घनिष्ट संबंध असून ते आपल्याला महागात पडतील असा इशारा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिला होता.