नवी दिल्ली: संयुक्त किसान मोर्चाने नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात 27 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदने सकाळपासूनच आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. सोमवारी आठवड्याच्या आणि कामाच्या पहिल्या दिवशीच दिल्ली-गुरुग्राम सीमेवर प्रचंड जाम झालेला पाहायला मिळत आहे.
आज शेतकऱ्यांचा भारत बंद, शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले- आम्ही पुढचे 10 वर्षे आंदोलन करण्यास तयार
हायवेवर शेकडो गाड्यांची लांबच-लाब रांग दिसत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सकाळपासून हा मार्ग बंद केला आहे. तर, तिकडे गाझीपूर सीमेवरही शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वे बंद केला आहे. NH 24 आणि NH 9 दोन्ही ब्लॉक करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी ट्वीट करुन या जामबद्दल सतर्क केलं आहे. यूपी ते गाझीपूरपर्यंतची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भारत बंदमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. दिल्ली-गुरुग्राम सीमेवर सकाळपासून झालेल्या ट्रॅफिक जाममुळे कार्यालयात जाणारे लोक वाटेतच अडकले आहेत. केएमपी एक्सप्रेस वेवर शेतकरी बसले आहेत. यामुळे पोलिसांनी एक्स्प्रेस वे बंद केला आहे. याशिवाय लाल किल्ल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले आहेत.
तिकडे, हरियाणाच्या कुरुक्षेत्रातील शहाबाद परिसरातही आंदोलक शेतकरी संतप्त झाले. शेतकर्यांनी रस्त्याच्या मधोमध गाद्या टाकून त्यावर झोपून रस्ता अडवला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गही बंद झालाय. शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे या मार्गावर ट्रकच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, गाझियाबाद आणि नोएडा पोलिसांनी आधीच वाहतूक वळवण्याचा मार्ग जारी केला आहे.