एकीकडे जागावाटपावरून महायुतीचे ठरत नसताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपाविरोधात आपल्या उमेदवाराला मारहाण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे या दोन पक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रात अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांवर बैठका होत आहेत. अशातच अरुणाचलमध्ये विधानसभेची निवडणूक सुरु आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीने ८ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यापैकीच एक उमेदवार व प्रदेशाध्यक्ष लिका सय्या यांना भाजपाच्या नेत्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी घडली आहे. याविरोधात आज राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
सय्या यांच्यावर भाजपाने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने केला आहे. याचबरोबर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सुरक्षा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. नानसई येथे भाजप उमेदवार आणि नेत्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सय्या हे नानसई मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. रविवारी ते प्रचार करत असताना भाजपाच्या उमेदवाराने गाठून त्यांना मारहाण केली. याविरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि अरुणाचल प्रदेशचे प्रभारी संजय प्रजापती यांनी याला दुजोरा दिला असून भाजपावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.