देशामध्ये सरासरी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असताना मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी बातमी हाती येत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह अनेकांना चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. खाजगी हवामान अंदाज वर्तविणारी संस्था स्कायमेटने केरळमध्ये यंदा मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचे म्हटले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने अद्याप मान्सून सुरू होण्याचा अंदाज जाहीर केलेला नाही. परंतू, एप्रिलमध्ये त्यांनी नैऋत्य मान्सूनच्या काळात उत्तर-पश्चिम भारत, पश्चिम भारत, मध्य आणि पूर्वोत्तर भारतामध्ये सामान्य ते सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. दख्खनच्या पठारावरील भाग, त्याला लागून असलेला पूर्व आणि पूर्वोत्तर क्षेत्रातील काही भागात तसेच उत्तर-पश्चिम क्षेत्रातील काही भागांमध्ये सामन्य पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.
स्कायमेटच्या ताज्या अंदाजानुसार उत्तर भारतात 18 मे नंतर गडगडाट व वादळे सुरू होतील. या वर्षी जूनपर्यंत गरम हवामान कायम राहील. मान्सूनची सुरुवात कमी आणि विलंबाने होणार असल्याचे दिसत असल्याचे म्हटले आहे. स्कायमेटचे संस्थापक-संचालक जतिन सिंग यांनी 15 दिवसांच्या पावसाच्या अंदाजावर एक ट्विट केले आहे. यामध्ये रीप पिकांच्या पेरणीलाही उशीर होण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.
मान्सून कधी येतो...दरवर्षी मान्सून सामान्यपणे १ जूनला केरळच्या किनाऱ्यावरून भारतात प्रवेश करतो. यंदा तो काहीसा उशिराने येणार आहे. असे असले तरी स्कायमेटच्या आधीच्या अंदाजानुसार मान्सून जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९४ टक्के कोसळणार आहे. तर हवामान विभागानुसार या काळात ८३.५ मिमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के होणार आहे.
अल निनोचा प्रभावयावर्षी अल निनोचा प्रभावही पाहायला मिळणार आहे. म्हणजेच दुष्काळासारख्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार अल निनोची स्थिती मान्सूनदरम्यान, विकसित होऊ शकते. तसेच मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात याचा प्रभाव दिसून येऊ शकतो. मात्र याचा अर्थ पाऊस कमी पडेल असा नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अल निनोच्या दरम्यान, सामान्य आणि सामान्यापेक्षा अधिक पाऊस पडला आहे.