पंजाबच्या सर्वात जुन्या लष्करी तळावर आज पहाटेच गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये कमीत कमी चार लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सैन्य दलाची क्विक रिस्पॉन्स टीम काही केल्या पंजाब पोलिसांना आत जाऊ देत नसून आतमध्ये काय सुरु आहे याची काहीही माहिती बाहेर दिली जात नाहीय. अशातच एक मोठी अपडेड हाती येत आहे.
भटिंडा मिलिट्री कॅम्पमधून दोन दिवसांपूर्वी एक इन्सास रायफल आणि २८ काडतुसे गायब झाली होती. याच बंदुकीतून गोळीबार झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आर्मीचा पूर्ण एरिया सील करण्यात आला असून बाहेरील रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने थांबवून तपासणी केली जात आहे. पोलिसांना हा सैन्याचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून आतमध्ये जाऊ दिले जात नाहीय.
हा दहशतवादी हल्ला असल्याचे वाटत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 80 मीडियम रेजिमेंट ऑफिसर्स मेसमध्ये सैन्यातील जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर हा गोळीबार केला आहे. दोनच दिवसांपूर्वी राफयल आणि काडतुसे गायब झाली होती, असे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे.
हल्लेखोर साध्या कपड्यांमध्ये होता. खबरदारीचा उपाय म्हणून कॅम्प परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. ज्याने गोळीबार केला त्याला ताब्यात घेण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर संध्याकाळपर्यंत घटनेबाबत अधिक तपशील जारी केला जाईल. या घटनेबाबत लष्कराने आधीच आपली भूमिका मांडली आहे, यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही. असे लेफ्टनंट कर्नल अमिताभ, पीआरओ दक्षिण पश्चिम कमांड जयपूर यांनी म्हटले आहे.