New Delhi To Kashmir Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेनची क्रेझ अद्यापही भारतीय प्रवाशांमध्ये कायम आहे. वंदे भारत ट्रेनची सेवा देशभरात सुरू आहे. प्रवाशांकडून वंदे भारत ट्रेनला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीने भारतीय रेल्वेने एक नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. प्रवाशांचे हित लक्षात घेता भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेनची वैविध्यपूर्ण प्रकार आणले. यामध्ये अमृत भारत ट्रेन, वंदे भारत मेट्रो यांचा समावेश आहे. आता वंदे भारत ट्रेनचा आणखी एक प्रकार लवकरच भारतीय प्रवाशांचा सेवेत असणार आहे, तो म्हणजे वंदे भारत स्लीपर ट्रेन. पहिली झलक समोर आणल्यानंतर वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या चाचण्यांना सुरुवात झाली आहे. लवकरच पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन मार्गस्थ होणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच वंदे भारत ट्रेनची सर्वांत उंच चिनाब नदीवरील पुलावरून यशस्वी चाचणी करून भारतीय रेल्वेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळे लवकरच दिल्लीहून काश्मीरला वंदे भारत ट्रेनने प्रवास करणे तसेच काश्मीर भागाला देशाच्या अनेक भागांशी जोडणे शक्य होणार आहे.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक अंतर्गत वंदे भारत ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या सर्वांत उंच पुलावरून वंदे भारत ट्रेन धावल्याचे अवघ्या देशाने पाहिले. भारतीय रेल्वेसाठी हा सर्वांत मोठा मैलाचा दगड ठरणार असून, यामुळे देशभरातून काश्मीरसाठी रेल्वे सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. काश्मीरमधील अद्भूत निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत, दऱ्याखोऱ्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. देशाची राजधानी दिल्लीहून काश्मीरसाठी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची तयारी भारतीय रेल्वेने सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यासाठी खास सुविधा असणारी वंदे भारत ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, स्लीपर वंदे भारत ट्रेनही या मार्गावर सुरू होऊ शकते, असा दावा केला जात आहे.
८०० किमीचे अंतर १३ तासांत कापणे शक्य
काही मिडिया रिपोर्टनुसार, दिल्ली ते श्रीनगर वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू केली जाऊ शकते. चेअर कार वंदे भारत ट्रेनसह स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते. स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू केल्यास दिल्ली ते श्रीनगर हे सुमारे ८०० किमीचे अंतर १३ तासांत कापणे शक्य होऊ शकते. नवी दिल्ली स्थानकातून रात्री ७ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता श्रीनगर स्थानकात वंदे भारत ट्रेन पोहोचू शकते. अशी झाल्यास देशाच्या राजधानी दिल्लीतून काश्मीर खोऱ्यात सुरू होणारी ही पहिली रेल्वे सेवा ठरणार आहे.
किती असतील तिकिटाचे दर अन् कुठे असतील थांबे?
समजा स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू केल्यास त्या ट्रेनचे तिकीट दर किती असतील तसेच या ट्रेनला कोणत्या ठिकाणी थांबे देण्यात येतील, याबाबतही काही माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये ११ एसी ३-टायर (३ए) कोच, ४ एसी २-टायर (२ए) कोच आणि १ फर्स्ट क्लास (१ए) एसी कोच असेल. या ट्रेनच्या तिकिटाच्या दराबाबत बोलायचे झाले तर, ३एसी कोचचे भाडे २००० रुपये, २एसी कोचचे भाडे २५०० रुपये आणि १एसी कोचचे भाडे ३००० रुपये असू शकते. तसेच दिल्लीहून श्रीनगरला जाणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन ७ प्रमुख स्थानकांवर थांबेल. दिल्लीहून सुटून ही ट्रेन अंबाला कॅन्ट जंक्शन, लुधियाना जंक्शन, कठुआ, जम्मू तवी, श्री माता वैष्णोदेवी कटरा, संगलदन, बनिहाल आणि श्रीनगर या स्थानकांवर थांबेल, असे म्हटले जात आहे.