नवी दिल्ली - भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह अन्य गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत राजपथावर 72 वा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला. राजपथावर निघालेल्या परेडमध्ये यंदा उत्तर प्रदेशकडूनराम मंदिराची प्रतिकृती उभारत चित्ररथ सादर करण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून यंदा उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून राम मंदिर प्रतिकृती असलेल्या या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येणार आहे.
राम मंदिराची प्रतिकृती असलेला चित्ररथ राजपथावरून मार्गस्थ झाला तेव्हा प्रेक्षकांकडूनही त्याचं टाळ्या वाजवून भरभरून कौतुक करण्यात आलं. तर काही जणांनी या मंदिरालाच हात जोडून नमस्कार केला. उत्तर प्रदेशचे माहिती संचालक शिशिर यांनी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिवसाला उत्तर प्रदेशच्या भव्य चित्ररथाचा प्रथम स्थान देऊन गौरव करण्यात आला आहे. सर्व टीमला मनापासून शुभेच्छा. गीतकार विरेंद्र सिंह यांचे विशेष आभार" असं शिशिर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशला सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला होता. यंदा मात्र राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. प्रजासत्ताक दिनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सोशल मीडियावरून या चित्ररथाचं दर्शन घडवलं होतं. "जहां अयोध्या सियाराम की, देती समता का संदेश... कला और संस्कृति की धरती, धन्य-धन्य उत्तर प्रदेश..." असं ट्विट करत योगींनी चित्ररथाचा फोटो शेअर केला होता.
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी या मोहिमेला प्रतिसाद देत देणग्या दिल्या. राम मंदिर उभारणीसाठी रामनाथ कोविंद यांनी आपल्यातर्फे आणि आपल्या कुटुंबीयाच्या वतीने पाच लाख, 100 रुपयांची देणगी दिली. तर, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांनी पाच लाख, 11 हजार रुपयांची देणगी दिली. यासह अनेक राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनीही देणग्या दिल्याची माहिती मिळाली आहे.
अगदी सामान्य माणसांपासून, व्यापारी, उद्योजकांपर्यंत सर्वजण या मोहिमेत सहभागी होत राम मंदिरासाठी देणग्या देत आहेत. देशभरात ही मोहीम राबवली जाणार असून, यातून जमा झालेली रक्कम केवळ राम मंदिराच्या निर्माणासाठी वापरली जाणार आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देणगी गोळा करण्याची देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली. ही मोहीम 27 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, 13 कोटी देशवासीयांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.