ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - देशातील बडया व्यक्ती आणि कॉर्पोरेटसनी कर्जाची जी रक्कम थकवली आहे तो आकडा धक्कादायक आहे असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले. आरबीआयने सर्वोच्च न्यायालयाला जी माहिती दिली त्यानुसार बडया व्यक्ती आणि कॉर्पोरेटसनी लाखो कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे.
काहींनी व्यक्तीगत स्तरावर पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज घेतल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. काही हजार रुपयांचे कर्ज घेणा-या गरीब शेतक-यांकडे कर्जाच्या वसूलीसाठी तगादा लावला जातो मात्र हजारो कोटी रुपयांचे कर्जे घेणारे कॉर्पोरेटस कंपनीला आजारी दाखवून आनंदात रहातात त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला.
व्यवस्था सुधारणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असून, केंद्रीय अर्थमंत्रालय आणि इंडियन बँक असोशिएशनला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात त्यांनाही न्यायालयाने प्रतिवादी बनवले आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे.