कटिहार: शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ९६० कोटींहून अधिक रुपये जमा झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातल्या आजमनगरमधील पस्तिया गावातल्या दोन विद्यार्थ्यांच्या खात्यात एकाएकी ९६० कोटी जमा झाल्यानं याची सर्वत्र चर्चा झाली. गुरुचरण विश्वास आणि असित कुमार १५ सप्टेंबरला त्यांच्या बँक खात्यातली शिल्लक तपासण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रात गेले होते. आपल्या खात्यात कोट्यवधी रुपये असल्याची माहिती त्यावेळी त्यांना समजली. त्याचवेळी शेकडो किलोमीटरवर असलेल्या मुंबईत अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकला होता.
बिहारच्या कटिहारमध्ये राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी इंडुसलँड बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन खात्यातली शिल्लक तपासली. या ठिकाणी पैशांच्या व्यवहारासाठी स्पाईस मनी कंपनीच्या यंत्रणेचा वापर होतो. अभिनेता सोनू सूद या कंपनीचा ब्रँड ऍम्बेसिडर आहे. या कंपनीत सोनू सूदची मोठी भूमिका आहे. त्यामुळेच मुंबईपासून शेकडो किलोमीटरवर असलेल्या कटिहारमधील बँक खात्यातल्या व्यवहारांचा सोनू सूदशी काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी उदयन मिश्रांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
सायबर क्राईमचं प्रकरण असण्याची शक्यतादोन विद्यार्थ्यांच्या खात्यात अचानक झालेले व्यवहार सायबर क्राईमशी संबंधित असावेत अशी शक्यता बँक व्यवस्थापक एम. के. मधूकर यांनी व्यक्त केली. या प्रकरणी बँकेनं स्पष्टीकरण दिलं आहे. आता इंडुसलँड बँकेचा समावेशदेखील तपासात करण्यात आला असून त्यांच्याकडून यासंबंधीची कागदपत्रं जारी करण्यात येत आहेत, असं मधूकर यांनी सांगितलं.