Bihar Politics ( Marathi News ) :बिहारमध्ये उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून उद्याच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत चाचणीचा सामना करावा लागणार आहे. मात्र या चाचणीआधीच बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ सुरू आहे. नितीश कुमार आणि भाजप यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करता येऊ नये, यासाठी आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच नितीश कुमार यांनी बोलावलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला जेडीयूचे चार आमदार गैरहजर राहिल्याने खळबळ उडाली आहे. तसंच या आमदारांचे मोबाईलही बंद असल्याचे समजते.
बैठकीला काही आमदार अनुपस्थित राहिल्याने नितीश कुमार यांची डोकेदुखी वाढली आहे. अनुपस्थित राहिलेल्या आमदारांमध्ये विमा भारती, सुदर्शन, दिलीप राय आणि रिंकू सिंह यांचा समावेश आहे. तसंच डॉ. संजीव हेदखील या बैठकीला आले नव्हते. मात्र ते सध्या पाटण्याबाहेर असून त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना याबाबत कल्पना दिली होती.
बैठकीत नितीश कुमारांनी काय सूचना दिल्या?
बहुमत चाचणीचा सामना करण्यासाठी काही तास बाकी असताना झालेल्या बैठकीत नितीश कुमार यांनी आमदारांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. "सर्वांना उद्या सभागृहात एकजूट राहायचं आहे. सभागृहात कोणीही अतिउत्साह दाखवायचा नाही. कारण आकडे आपल्यासोबत आहेत. नियमानुसार आपल्याला सभागृह चालवायचं आहे. आपण बहुमताची चाचणी नक्कीच जिंकू," असा विश्वास नितीश कुमारांना व्यक्त केला आहे.
दरम्यान, आरजेडीचे सर्व आमदार तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी जमले असून काँग्रेसचे आमदारही हैदराबाद येथून पाटण्यात येताच तेदेखील तेजस्वी यांच्या निवासस्थानी जाणार असल्याचे समजते. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीवेळी बिहारमध्ये नक्की काय घडतंय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.