नवी दिल्ली - बिहारच्या पाटणा जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा जिल्ह्यात ट्रक आणि ऑटोची जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. बाढ़-बख्तियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (25 मार्च) हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी आहेत.
तोरंगणा घाटात बस दरीत कोसळली; 6 प्रवासी ठारमोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा घाटात खासगी बस 25 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. रविवारी (24 मार्च) झालेल्या या अपघातात 6 जणांचा मृत्यू असून 45 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी त्र्यंबकेश्वर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खासगी बस मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरून पालघरला येत होती. यावेळी दुपारी पावणे तीनच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस 25 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये 6 जण ठार झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून 45 जण जखमी झाले आहेत. अपघातस्थळी पोलिसांचे पथक पोहोचले असून बस दरीतून वर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
कर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यूकर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. शुक्रवारी (22 मार्च) सकाळी हा अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले होते. सिंदगी परिसरातील हा अपघात झाला होता. क्रूझर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळली होती. या अपघातात क्रूझरमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 20 ते 30 वयोगटातील तरुणांचा मृतांमध्ये समावेश होता. मृत्युमुखी पडलेले पर्यटक हे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.