पाटणा -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारार्थ कटिहार येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांना निशाण्यावर घेतले. राहुल म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वप्रथम घंटी वाजवली आणि नंतर फोनची बॅटरी लावायला सांगितली. मात्र, कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही.
राहुल गांधी म्हणाले, कोरोना काळात लाखो मजूर पायपीट करून आपल्या घरी येत होते. पण या कोरोनासंकटात मोदी आणि नितीश यांनी मजुरांची मदत केली नाही. मात्र, काँग्रेस म्हणाली होती, की आम्ही मजुरांची मदत करू इच्छितो. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्रितपणे बिहारला लुटले आहे आणि आता बिहारमधील लोक त्यांना उत्तर देतील, असेही राहुल म्हणाले.
राहुल म्हणाले, मजूर पायपीट करत असताना, नितीशजी आणि मोदीजी कुठे होते. तेव्हा मदत केली नाही आणि आता मतं मागायला येत आहेत. राहुल यांनी आरोप केला, की हे दोघेही केवळ आपल्या धनाड्य मित्रांचीच मदत करत आहेत. एवढेच नाही, तर बिहारमधील लोकांना बाहेर जाऊन का काम करावे लागते? येथे रोजगार का नाही? असे प्रश्नही राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केले.
राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की दोन कोटी लोकांना रोजगार देणार. नितीश कुमारही असेच म्हणाले होते. मात्र, कुणीही आपले आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी संपूर्ण देशाला लाइनमध्ये उभे केले होते. नोटाबंदीच्या काळात केवळ देशातला गरीब नागरीकच रांगेत उभा होता. पंतप्रधान मोदींनी गरिबांच्या खिशातून पैसा काढून तो आपल्या श्रीमंत मित्रांच्या खिशात घातला. एवढेच नाही, तर पूर्वी नोटाबंदी, मग जीएसटी आणि आता शेतकऱ्यांना नष्ट करणारा कायदा तयार करण्यात आला आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.