पाटणा - एकीकडे भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएमधील जागावाटपाचा घोळ आणि एलजेपीची नाराजी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असताना दुसरीकडे आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील जागावाटपाचे गणित सुटले आहे. महाआघाडीमध्ये ठरलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आरजेडी १४४, काँग्रेस आणि डावे पक्ष २९ जागा लढवणार आहेत.महाआघाडीच्या नेत्यांना पाटणा येथे पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत माहिती दिली. यावेळी महाआघाडीमधील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. बिहारमधील महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय, सीपीएम आणि व्हीआयपी या पक्षांचा समावेश आहे.यावेळी काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष अविनाश पांडे यांनी सांगितले की, काही वैचारिक मतभेद असले तरी एक भक्कम आघाडी ज्यामध्ये आरजेडी, काँग्रेस, व्हीआयपी आणि डावे पक्ष एकत्र आले आहेत. २०१५ मध्ये महाआघाडीला जनतेने बहुमत दिले होते. मात्र दुर्दैवाने त्या बहुमताचे अपहरण झाले. नितीश कुमार यांनी धोका दिला आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. आता जनता त्यांना माफ करणार नाही. या महाआघाडीचे नेतृत्व तेजस्वी यादव करतील. तर तेजस्वी यादव म्हणाले की, जर बिहारच्या जनतेने संधी दिली तर मी त्यांच्या मानसन्मानाचे रक्षण करेन. आम्ही बिहारी आहोत. जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. माझा डीएनए शुद्ध आहे. बिहारचे आजचे सरकार हे साठलेले अस्वच्छ पाणी आहे. तर आम्ही वाहत्या नदीचा स्वच्छ आणि शुद्ध प्रवाह आहोत.२०१५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडी आणि जेडीयूने प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. तर काँग्रेसने ४१ जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत महाआघाडीला दणदणीत विजय मिळाला होता. मात्र नितीश कुमार यांनी काही काळानंतर महाआघाडीची साथ सोडत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये प्रवेश केला होता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बिहारमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर दुसऱ्या टप्प्यातील मदतान ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.