सत्तेत आल्यास दारुबंदीबाबत पुनर्विचार करणार, बिहारी जनतेला काँग्रेसचं आश्वासन
By बाळकृष्ण परब | Published: October 21, 2020 05:49 PM2020-10-21T17:49:54+5:302020-10-21T17:56:23+5:30
Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाआघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनाम्यामधून अनेक आश्वासने दिली जात आहेत.
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता ऐन रंगात आला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाआघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनाम्यामधून अनेक आश्वासने दिली जात आहेत. दरम्यान, काँग्रेसनेही बदलावपत्र या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या बदलावपत्रामधून काँग्रेसचे बिहारी जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. त्यापैकी एक आश्वासन हे दारुबंदीबाबतही दिले आहे. सत्तेत आल्यास दारुबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करू असे आश्वासन काँग्रेसने बिहारमधील जनतेला या जाहीरनाम्यामधून दिले आहे.
काँग्रेसने सांगितले की, दारुबंदीमुळे राज्या्च्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच राज्य सरकार दारुबंदीबाबतच्या सकारात्मक हेतूपासून भरकटले आहे. त्यामुळे राज्यात अवैध व्यापार होत आहे आणि पोलिसांना लाभ पोहोचवला जात आहे. मात्र जनता अजूनही त्रस्त आहे. अशा परिस्थित काँग्रेस सत्तेवर आल्यावर या निर्णयाचा योग्य तो पुनर्विचार करणार आहे.
२०१५ मध्ये सत्तेत आल्यानंतर नितीश कुमार यांनी दारुबंदीचा निर्णय घेतला होता. तसेच हा एक मोठा निर्णय असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र निवडणुकीच्या काळात बिहारमध्ये अनेक ठिकाणी अवैध दारू पकडण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामधून अनेक महत्त्वपूर्ण आश्वसने दिली आहेत. यामध्ये १०० युनिटपर्यंत निम्मे वीजबिल, मुलींना स्कूटी, तरुणांना बेरोजगारी भत्ता, विधवांना पेन्शन, अशी आश्वासने देण्यात आली आहेत.
दरम्यान, काँग्रेस प्रमाणेच लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनीही दारुबंदीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. केवळ दारुबंदी केल्याने महिला सशक्तीकरण झाले आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच दारुबंदीच्या निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही, असा दावाही त्यांनी केला होता.
काँग्रेस बिहारमध्ये महाआघाडीचा घटक पक्ष आहे. या निवडणुकीत काँग्रेस एकूण ७० जागांवर निवडणूक लढवत आहे. बिहारमध्ये २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, तीन टप्पांमधील मतदान आटोपल्यानंतर १० नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार आहे.