असिफ कुरणे
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप, जेडीयूच्या आक्रमक प्रचाराला वेग आला आहे. मात्र, एनडीएच्या उमेदवारांचा बहुतांश कल हा पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेभोवतीच असल्याचे जाणवत आहे. गेली १५ वर्षे सत्तेत असणाऱ्या नितीशकुमार यांच्या ऐवजी मोदींच्या करिश्म्यावर एनडीएला जास्त विश्वास वाटत आहे.
निवडणूक बिहारची असली तरी भाजप उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांनी केलेली कामे, कोरोना काळात गरीब लोकांना देण्यात येत असलेले अन्नधान्य, शेतकऱ्यांना मिळणारे पैसे, स्थलांतरित कामगारांना करण्यात आलेली मदत, स्पेशल रेल्वे आदी कामे मतदारांपुढे मांडताना दिसतात. राममंदिर, कलम ३७०, काश्मीरचे विभाजन आदी मुद्देदेखील मांडले जात आहेत.
महाआघाडीमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन केल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविषयी नाराजी दिसते. तीन टर्म सत्तेत असल्यामुळे जनतेत नाराजी असणारच; पण सरकारने रस्ते, वीज, उद्योगांबाबत चांगले काम केले. असे असले तरी कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, कोरोनाची स्थिती, स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नांवरून काहीसा नाराजीचा सूर आहे; पण पंतप्रधान मोदींबाबत बिहारी जनता समाधानी आहे. त्यांच्या कामाला लोक पसंत करतात असे एका भाजप नेत्याने सांगितले. जनता दल संयुक्तचे उमेदवार नितीशकुमार सरकारच्या कामासोबत केंद्राच्या कामाचा प्रचार करीत आहेत.लोकजनशक्ती पक्षाचे उघड समर्थन -
एलजेपीच्या चिराग पासवान यांनी मोदी से कोई बैर नही, नितीश तेरी खैर नहीं असा उघडउघड नारा दिला आहे. पासवान फक्त बिहारमधील एनडीएतून बाहेर पडलेले आहेत, तसेच भाजपचे अनेक मोठे नेते त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पदापासून रोखण्याचा चंग चिराग पासवान यांनी बांधला आहे.