पाटणा : येत्या सोमवारी वा त्यानंतर नितीशकुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपप्रणीत रालोआला बिहार विधानसभा निवडणुकीत १२५ जागांवर विजय मिळाला. त्यात भाजपचा वाटा ७३ जागांचा आहे. मात्र, असे असले तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले आहे.
नितीशकुमार यांनी प्रचारादरम्यान ही आपली अखेरची निवडणूक, असे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार दिवाळीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारा नेता हा नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला जाईल. आतापर्यंत हा विक्रम श्रीकृष्ण सिन्हा यांच्या नावावर आहे. सिन्हा तब्बल १७ वर्षे बिहारच्या मुख्यमंत्रीपदी होते. मात्र, आता नितीशकुमारांकडे हा बहुमान जाईल.