बिहार व अन्य राज्यांत भाजपने चांगले यश मिळविले. त्यामुळे मोदी व भाजप यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट होते. नितीश मात्र आता बिहारमध्ये नकोसे झाले, असे दिसते.
बिहारमध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा भाजप आणि नितीश कुमार यांनी सुरुवातीला प्रचार केला, त्यात महाराष्ट्र व मुंबई पोलिसांवर तोंडसुख घेतले. पण तो मुद्दा चालत नाही, हे पाहून तो प्रचारातून मागे घेतला.
बेरोजगारी आणि कोरोनामुळे बिहारला आपल्या गावी परतलेले ४७ लाख कामगार हा तेजस्वी यांनी प्रचाराचा मुद्दा केला आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला, असे दिसते. बेरोजगार तरुण आणि घरी परतलेले कामगार, त्यांची कुटुंबे यांनी नितीश यांच्या विरोधात मतदान केल्याचा अंदाज आहे.
चिराग पासवान यांनी नितीश यांच्या सुमारे १२२ उमेदवारांच्या विरोधात उमेदवार केले. चिराग यांचा एकच उमेदवार विजयी झाला, पण त्यांनी नितीश यांच्या किमान २५ जणांना धूळ चारली, असा प्राथमिक अंदाज आहे. चिराग यांना भाजप नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा होती. पण भाजपने ते अमान्य केले.