- असिफ कुरणे
पाटणा : बिहार निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना तेजस्वी यादव यांच्यासोबत चिराग पासवान या तरुण नेत्याचा सामना करावा लागत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या जागांवर संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांसमोर चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने कडवे आव्हान उभे केले आहे. जातीय गणितासोबतच नव्याने तयार झालेल्या समीकरणांनी नितीशकुमार यांची चिंता वाढली आहे.
दुसऱ्या टप्प्यात मध्य व उत्तर बिहारच्या १७ जिल्ह्यांमधील ९४ जागांवर उद्या मतदान होणार आहे. येथे जेडीयू ४३ जागा, भाजप ४६ जागा, आरजेडी ५६, तर काँग्रेस २४ जागांवर लढत आहे. यात जेडीयू लढवीत असलेल्या ४३ जागांवर पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे उमेदवारदेखील आहेत. २
०१५ च्या निवडणुकीत महागठबंधनने या पट्ट्यातील ७० जागा जिंकल्या होत्या, तर एनडीएला २२ जागांवर समाधान मानावे लागले होते. या पट्ट्यातील जागांवर जेडीयू व भाजपचे प्राबल्य दिसत असले तरी १५ वर्षे सत्तेत असल्यामुळे तयार झालेल्या सरकारविरोधी भावनेचा सामना जेडीयूला करावा लागत आहे.