नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज एकूण 17 जिल्ह्यातील 94 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 1463 उमेदवार नशीब आजमावत असून, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, शिवहर, सीतामढी, मधुबनी, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सीवान, छपरा, वैशाली, समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया, भागलपूर, नालंदा आणि पाटणा, या जिल्ह्यांत मतदान होत आहे.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी मतदारांना केले असे आवाहन -दुसऱ्या टप्प्यातील या मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारच्या मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी एक ट्विट करत म्हटले आहे, ‘बिहार विधानसभा निवडणुकीत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल. मी सर्व मतदारांना आवाहन करतो, की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करावा. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून मास्कचादेखील वापर करावा'
गृह मंत्री अमित शाह यांनी ट्विट करत म्हटले आहे, ‘बिहारच्या प्रत्येक नागरिकाच्या अत्यंत मुल्यवान मतानेच राज्याला लूट आणि गुन्हेगारीच्या काळ्या युगातून बाहेर काढून विकास आणि सुशासनाच्या सोनेरी रस्त्यावर आणले आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदारांना आवाहन करतो, की राज्यातील शांतता, समृद्धि आणि प्रगती कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करा.’
11 राज्यांतील 54 विधानसभा जागांसाठीही पोट निवडणूक - बिहारमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाबरोबरच देशातील 11 राज्यांतही 54 विधानसभा जागांवर पोट-निवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशातील सात विधानसभा जागांवर 88 उमेदवार नशीब आजमावत आहेत. येथे भाजपा, सपा, काँग्रेस आणि बसपाने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. या पोटनिवडणुकीचा योगी सरकारवर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नसला तरी, याकडे 2022च्या निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे.
उत्तर प्रदेश शिवाय, मध्य प्रदेशातील 28, गुजरात मधील 8, कर्नाटक, ओडिशा, झारखंड आणि नगालँडमध्ये प्रत्येकी दोन तर तेलंगाणा, छत्तीसगज आणि हरियाणात प्रत्येकी एका जागेसाठी पोट-निवडणूक होत आहे.