संघ, भाजपाची साथ सोडा, महाआघाडीसोबत या; काँग्रेसची नितीश कुमारांना ऑफर
By बाळकृष्ण परब | Published: November 11, 2020 08:57 AM2020-11-11T08:57:38+5:302020-11-11T09:06:05+5:30
Bihar Assembly Election Result News : बिहारमधील निकालांमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाच्या जागांमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. मात्र या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाच्या जागांमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. तर भाजपा एनडीएमधील मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना संघ आणि भाजपाची साथ सोडण्याचे आवाहन केले आहे.
रात्री उशिरा बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आज सकाळी एकापाठोपाठ एक ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना भाजपाचा साथ सोडण्याचे आवाहान केले आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की, भाजपा आणि संघ हे अमरवेलीप्रमाणे आहे. ते ज्या झाडाला विळखा घालतात. ते झाड वाळून जाते. त्यानंतर या वेलीचा त्यावर कब्जा होतो. नितीशजी लालू प्रसाद यादव यांनी तुमच्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनांमध्ये सोबत तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे संघ आणि भाजपाच्या विचारधारेला सोडचिठ्ठी देऊन तेजस्वी यांना आशीर्वाद द्या आणि अमरवेलीसारख्या असलेल्या भाजपा आणि संघाला बिहारमध्ये वाढण्यापासून रोखा.
भाजपा/संघ अमरबेल के समान हैं, जिस पेड़ पर लिपट जाती है वह पेड़ सूख जाता है और वह पनप जाती है।
— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
नितीश जी, लालू जी ने आपके साथ संघर्ष किया है आंदोलनों मे जेल गए है भाजपा/संघ की विचारधारा को छोड़ कर तेजस्वी को आशीर्वाद दे दीजिए। इस “अमरबेल” रूपी भाजपा/संघ को बिहार में मत पनपाओ।
नितीशजी आता तुमच्यासाठी बिहार हे खूप छोटे झाले आहे. आता तुम्ही भारताच्या राष्ट्रीय राजकारणात या. सर्व समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये ऐक्य घडवून आणण्यास मदत करा. इंग्रजांनी वाढवलेली फूट पाडा आणि राज्य करा ही संघाने जोपासलेली नीती हाणून पाढण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले.
नितीश जी, बिहार आपके लिए छोटा हो गया है, आप भारत की राजनीति में आ जाएँ। सभी समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारधारा में विश्वास रखने वाले लोगों को एकमत करने में मदद करते हुए संघ की अंग्रेजों के द्वारा पनपाई “फूट डालो और राज करो” की नीति ना पनपने दें। विचार ज़रूर करें।
— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
हीच महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रति खरी श्रद्धांजली असेल. तुम्हीं त्यांच्याच वारशामधून समोर आलेले नेते आहात. आता तिथेच या. जनता पक्ष संघाच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून फुटला होता. याची मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. भाजपा आणि संघाची साथ सोडा आणि देशाला विनाश होण्यापासून वाचवा, असेही दिग्विजय सिंह म्हणाले.
यही महात्मा गॉंधी जी व जयप्रकाश नारायण जी के प्रति सही श्रद्धांजलि होगी। आप उन्हीं की विरासत से निकले राजनेता हैं वहीं आ जाइए। आपको याद दिलाना चाहूँगा जनता पार्टी संघ की Dual Membership के आधार पर ही टूटी थी। भाजपा/संघ को छोड़िए। देश को बर्बादी से बचाइए।
— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र एनडीएला मिळालेल्या १२५ जागांमध्ये सर्वाधिक ७४ जागा ह्या भाजपाला मिळाल्या आहेत. तर आतापर्यंत बिहार एनडीएमधी मोठा पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडला केवळ ४३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.