नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीचा निकाल पाहता सर्वच एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरले आहेत. एनडीएने बाजी मारली तर आरजेडीने सुद्धा चांगली टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. यातच, असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'ने बिहारमध्ये पाच जागा जिंकून कमाल केली आहे.
बिहार निवडणुकीत ओवैसी यांच्या पक्षाच्या कमालीचा अंदाज निवडणूक विश्लेषकांना बांधता आला नाही. दरम्यान, सीमांचलमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत लोक एनडीएला पराभूत करण्यासाठी मतदान करतील आणि त्याचा फायदा महाआघाडीला होईल, असे गणित असे मांडण्यात येत होते. मात्र ओवैसी यांच्या पक्षाला इतक्या जागा मिळतील, अशी अपेक्षा कोणालाही नव्हती.
बिहारनंतर उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये निवडणुका लढवण्याची घोषणा महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी सतत ओवैसी यांच्यावर मतं फोडण्याचा आरोप केला. इतकेच नाही तर ओवैसी यांचा पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, आता बिहारमधील विजयामुळे खूश झालेल्या ओवैसी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, "बंगाल आणि यूपीच्या निवडणुकाही लढवणार आहोत, तुम्ही काय कराल? निवडणुका लढविणे हे आपले काम आहे आणि लोकशाहीने आम्हाला हा अधिकार दिला आहे."
पश्चिम बंगालमध्ये सुमारे ३० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या. सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीत थोडा फरक होता. जिथे भाजपाला ४०.२५ टक्के मतं मिळाली होती, तिथे ४३.२९ टक्के मते मिळाली. मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकारणात माहिर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासाठी आता ओवैसी यांची पार्टी हे एक आव्हान ठरू शकते. बिहारमध्ये ज्या प्रकारे मुस्लिमांनी ओवैसींच्या पक्षाला मतदान केले. त्यावरून हे स्पष्ट आहे की, आता देशातील मुस्लिमांनी ओवैसींच्या पक्षाकडे पर्याय म्हणून पाहण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीत ओवैसी यांच्या पक्षाने बंगालमध्ये निवडणुका लढविल्यास त्याचा थेट फायदा भाजपाला होईल आणि तृणमूल काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात एआयएमआयएमने बसपासोबत युती केली तर सपा-काँग्रेसचे गणित बिघडणार! बिहारमध्ये ओवैसी यांच्या एआयएमआयएमने बसपासोबत निवडणूक लढविली. या निवडणुकीत बसपाला एक जागा आणि एआयएमआयएमला पाच जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशात दलितांचे राजकारण करणाऱ्या बसपासोबत जर एआयएमआयएम निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर त्याचा थेट परिणाम काँग्रेस व समाजवादी पक्षाला होईल. उत्तर प्रदेशात मुस्लिम-यादवांची पारंपारिक मतं समाजवादी पार्टीच्या पारड्यात जाताना दिसून येतात. मात्र, जर उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांनी ओवैसींच्या पक्षाला स्वीकारले तर बिहारप्रमाणेच समाजवादी पार्टीसाठी धोक्याची घंटा ठरेल.