पटना : बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बिहार एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आलेल्या ट्रेंडवरून राष्ट्रीय जनता दल आणि तेजस्वी यादव यांचे समर्थक खूप खूश असल्याचे दिसून येत आहे.
मतमोजणीच्या दिवशी तेजस्वी यादव यांचे सोशल मीडिया हँडल्सवरून अभिनंदन होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, तरुणांमध्ये तेजस्वी यादव यांच्याविषयी असलेले आकर्षण या पार्श्वभूमीवर बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी यादव यांना पसंती दिली जाते की, मतदार नितीशकुमार यांना चौथ्यांदा संधी देतात, याचा फैसला आज होणार आहे.
सोशल मीडियाशिवाय पाटण्यातील राबडी निवासस्थानाबाहेरही मोठ्या संख्येने तेजस्वी यादव यांचे समर्थक जमा झाले आहेत. तेजस्वी यादव यांना अभिवादन करीत त्यांचे भाऊ व बहिणींनीही ट्विट केले आहे. तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य (ज्या सोशल मीडियात खूप सक्रिय आहेत) यांनी ट्विट करुन लिहिले आहे की, "विजय भव: तेजस्वी भव: बिहार."
दुसरीकडे, तेजस्वी यादव यांचे मोठे बंधू आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेज प्रताप यादव यांनीही ट्विट करून 'तेजस्वी भव: बिहार'चा नारा दिला आहे.
नितीशकुमार की तेजस्वी, कोण बाजी मारणार?बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. तमाम मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला दिलेले झुकते माप आणि तरुणांमध्ये तेजस्वी यांच्याविषयी असलेले आकर्षण या पार्श्वभूमीवर बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी यांना पसंती दिली जाते की, मतदार नितीशकुमार यांना चौथ्यांदा संधी देतात, याचा फैसला आज होणार आहे. बिहारमधील या निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारणार, हे पाहण्याचे ठरणार आहे.