नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election Results) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यावेळी बिहारची धुरा जनतेने नेमकी कुणाच्या हाती दिली हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. एक्झिट पोलचा विचार करता तेजस्वी यादव यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे. मात्र, मतमोजणीच्या काही वेळ आधीच, पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नये, असे स्पष्ट निर्देश तेजस्वी यादव यांनी आपल्या नेत्यांना दिले आहेत.
तेजस्वी यादव यांनी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या नेत्यांना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बोलावले आणि निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले, अनेक नेते कॅमेऱ्यासमोर पंतप्रधान मोदींविरोध बोलत आहेत, हे योग्य नाही. आता, अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर कारवाईही केली जाऊ शकते, असा इशाराही तेज्वी यांनी यावेळी दिला आहे.
तेजस्वी यादव हे निवडणुकीदरम्यान नितीश कुमार यांच्या विरोधात जेवढे आक्रमक वाटत होते, ते तेवढेच एक्झिटपोलच्या अंदाजानंतर परिपक्व वाटू लागले आहेत. तेजस्वी यांनी कालच आपल्या नेत्यांना संदेशही दिला, की निवडणुकीचा निकाल भलेही काही लागो, पण कुणीही कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार नाही.
यावेळी, निवडणुकीत आपला विजय झाला तरीही कुणी आतिशबाजी करणार नाही अथवा आपला पराभव झाला तरीही कुणी रस्त्यावर येऊन हुल्लडबाजी करणार नाही, असे निर्देशही तेजस्वी यांनी आपल्या नेत्यांना दिले आहेत.