नवी दिल्ली - बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र याच दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाषणाला उभे राहताच त्यांच्यावर कांदा फेकण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली आहे. मधुबनीच्या हरखालीमध्ये नितीश कुमार एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नोकऱ्यांवर बोलायला सुरुवात केली. तेव्हाच समोरील गर्दीतून कोणीतरी त्यांच्यावर कांदा फेकला. यावर नितीश कुमार नाराज झाले आणि आणखी फेका, फेकत राहा, याचा कोणताही परिणाम होणार नाही, असं बोलायला लागले. या घटनेवर तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर झालेल्या कांदा फेक घटनेची निंदा केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. "एका निवडणूक सभेत कोणीतरी आदरणीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिशेने कांदे फेकले. ही घटना निंदनीय, लोकशाहीविरोधी आणि अनिष्ट घटना आहे. लोकशाहीमध्ये विरोधाची अभिव्यक्ती केवळ मतदानामध्ये असायला हवी आणि याशिवाय इतर कोणतीही पद्धत स्वीकारू असू शकत नाही" असं ट्विट तेजस्वी यादव यांनी केलं आहे.
"हा हल्ला नितीश कुमारांवर झालेला जीवघेणा हल्ला आहे"
सभेतील या घटनेनंत सुरक्षा रक्षकांनी जेव्हा कंदा फेकणाऱ्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नितीश कुमार यांनीच त्यांना नको म्हणून सांगितलं. त्याला सोडून द्या, काही दिवसांनी स्वत:च त्यांना समजेल, असे ते म्हणाले. सुरक्षा पुरवल्यानंतर नितीश कुमारांनी त्यांचे भाषण पूर्ण केले. या प्रकरणावर बिहारचे मंत्री संजय कुमार झा यांनी विरोधकांना जबाबदार धरले आहे. विरोधकांना पटले आहे की, ते मतदानातून आम्हाला हरवू शकत नाहीत, यामुळे ते अशाप्रकारच्या घटना घडवत आहेत. विरोधक पुन्हा तोच काळ परत आणण्याच्या प्रयत्नात आहेत. हा हल्ला नितीश कुमारांवर झालेला जीवघेणा हल्ला आहे. ते तुम्हाला आवडो वा न आवडो मतांद्वारे सिद्ध होणार आहे. मात्र, हल्ला करून काय सांगू इच्छित आहात, हे बिहारची जनता पाहत आहे.
मुझफ्फरपूरच्या सकरामध्ये याआधी नितीशकुमार यांच्या हेलिकॉप्टरकडे कोणीतरी चप्पल फेकली होती. ही चप्पल हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचली नाही. तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार मंचावर होते. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. चप्पल फेकताना काही लोक घोषणाबाजी करत होते. या व्यतिरिक्त नितीश कुमारांच्या रॅलीमध्ये मुर्दाबादची घोषणाबाजीही झालेली आहे. एलजेपी प्रमुख चिराग पासवान यांच्या दाव्यानुसार नितीश कुमार यांच्याविरोधात लोकांमध्ये राग आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.