बिहारच्या रजौन ब्लॉक अंतर्गत प्राथमिक शाळा आसमानीचक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेच्या पर्समधून 35 रुपये गायब झाले, त्यानंतर शाळेतील सर्व मुलांना शपथ घ्यायला लावण्यासाठी ती विद्यार्थ्यांना घेऊन मंदिरात पोहोचली. तिने मुलांना शपथ घेण्यास सांगितली. शाळेतील शिक्षिका नीतू कुमारीवर हा आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार गेल्या बुधवारी घडला. कुटुंबीयांनी या प्रकरणावरून शाळेत गोंधळ घातला.
बुधवारी जेव्हा शिक्षिका नीतू कुमारी शाळेत पोहोचली तेव्हा तिच्या पर्समधून 35 रुपये गायब असल्याचं तिला आढळलं. शिक्षिकेने मुलांकडे पैशांबाबत विचारपूस सुरू केली. पण पैसे सापडले नाहीत. शाळेजवळच एक दुर्गा मंदिर आहे. नीतू कुमारने सर्व मुलांना दुर्गा मंदिरात नेलं. तिने एकामागून एक सर्व मुलांना शपथ द्यायला लावली. मात्र, बुधवारी याबाबत कोणालाच काही कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी, गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने मुलांचे पालक व ग्रामस्थ शाळेत पोहोचले. शपथ घेण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. शाळेत तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच बीआरपी संजय झा, बीपीएम गौरव कुमार आणि केआरपी भूपाल राजौन बीआरसी पूर्वे विद्यालयात पोहोचले. संतप्त ग्रामस्थांना समजावून सांगितलं. मात्र संतप्त ग्रामस्थ व मुलांच्या कुटुंबीयांकडून शिक्षिकेवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुभाषिनी कुमारी आणि शिक्षिका नीतू कुमारी यांना शाळेतून काढून टाकण्याची मागणीही केली. सुभाषिनी कुमारी यांनी सांगितले की, त्या मंगळवार आणि बुधवारी रजेवर होत्या. त्यांना या घटनेची फारशी माहिती नाही. बीईओ कुमार पंकज यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळाली आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.