बेगूसराय:बिहारच्या बेगुसरायमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका मृतदेहाला रस्त्यावर मरुन पडलेल्या प्राण्यापेक्षाही वाईट वागणूक दिली. पोलिसांनी एका बेवारस मृतदेहाला दोरी बांधून कच्चा रस्त्यावरुन महामार्गापर्यंत, शेकडो फूट फरफटत नेले. पोलीस इतक्यावर थांबले नाही, तर त्या मृतदेहाला अँब्यूलन्समधून नेण्याऐवजी एका ट्रॅक्टरवरुन नेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी लाखो ओपी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निपानिया सिमेंट गोदामापासून काही अंतरावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह खड्ड्यात पडलेला आढळला. मृतदेह कुजलेला होता आणि त्यातून प्रचंड दुर्गंधी येत होती. ही माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलीस आले आणि दुरुनच मृतदेह पाहून सफाई कर्मचाऱ्यांना बोलावले.
पोलिसांनी रुग्णवाहिकाही बोलावली नाहीसफाई कामगारांनी मृतदेहाच्या दोन्ही पायांना दोरी बांधून खड्ड्यातून बाहेर काढले. त्यानंतर तशाच अवस्थेत मृतदेह कच्च्या रस्त्यावरून पक्क्या रस्त्यावर आणला. त्यानंतर मृतदेह ट्रॅक्टरमध्ये भरून रुग्णालयात नेला. ही घटना समोर आल्यानंतर बेगुसरायचे एसपी योगेंद्र कुमार यांनी उपनिरीक्षक अनिल कुमार सिंहला निलंबित केले आहे. तसेच, याप्रकरणी लाखो पोलीस ठाण्याचे अध्यक्ष संतोष कुमार यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन वॉचमनवरही कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.