भागलपूर - बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने कौटुंबिक कलहाला कंटाळून इच्छामरणाची मागणी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या विद्यार्थ्याने इच्छा मरणाची मागणी केली आहे. राष्ट्रपतींकडून हे पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आलं आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. सरकारी सूत्रांनुसार मंगळवारी पंतप्रधान कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली तसेच या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी असे आदेश दिले आहेत.
भागपूर जिल्ह्यातील कहलगाव ठाणे अंतर्गत असणाऱ्या महिषामुंडा गावातील रहिवाशी मनोज कुमार मित्रा यांच्या 15 वर्षीय मुलाने राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं. कृष कुमार मित्रा असं या मुलाचं नाव आहे. कृषने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. त्याचसोबत कृषने पंतप्रधान, बिहारचे मुख्यमंत्री यांनाही पत्र पाठविलं होतं.
कृष मित्राने पत्रात लिहिलं आहे की, माझ्या आईकडून वारंवार माझा छळ केला जातो. अनेकदा आईने मला धमक्या दिल्या आहेत त्यामुळे मला त्रास होत आहे. आईच्या अशा वागण्यामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही. तर माझे वडील कॅन्सर पीडित आहेत. ते सध्या ग्रामीण विकास विभागात जिल्हा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर आई सुजाता इंडियन ओवरसीज बँक पटणा येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून कार्यरत आहे.
कृष हा त्याचे वडील मनोज कुमार मित्रा यांच्यासोबत राहतो. तो सध्या नववीच्या वर्गात शिकत आहे. मनोज आणि त्यांची पत्नी सुजाता यांच्यात अनेक वर्षापासून वादविवाद सुरु आहेत. त्यांच्या भांडणामुळे हे दोघंही वेगळे राहतात. कृषच्या घरच्यांना सुजाताचं वागणं पटत नाही त्यामुळे घरात वाद निर्माण होतात. या सगळ्या कौटुंबिक कलहामुळे माझी जगण्याची इच्छा नाही असं कृषने सांगितले आहे. त्यामुळे आपण राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधानांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.