पाटणा - बिहारमध्येनितीश कुमार यांनी जबरदस्त खेळी करत लालू प्रसाद यादवांच्या आरजेडीशी हातमिळवणी करून भाजपाला सत्तेतून बाहेरची वाट दाखवली होती. बदललेल्या सत्तासमीकरणांमध्ये नितीश कुमार यांच्याकडे बिहारचं मुख्यमंत्रिपद कायम आहे तर तेजस्वी यादव यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाली आहे. दरम्यान, नितीश कुमार एवढ्यावरच थांबलेले नाहीत. आता ते लोकसभेमध्ये एनडीएला मोठा धक्का देण्याची तयारी करत आहेत.
समोर येत असलेल्या माहितीनुसार बिहारमधील एनडीएचे तीन खासदार जेडीयू आणि आरजेडीच्या वाटेवर आहेत. हे तिन्ही खासदार लोकजनशक्ती पार्टी (पारस गट)मधील आहेत. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी ते एनडीएसोबत राहतील अशी घोषणा केली होती. अशा परिस्थितीत खगडिया येथील खासदार महबूब अली कैसर आरजेडीमध्ये जाऊ शकतात. तर वैशाली येथील खासदार वीणा देवी आणि नवादा येथून खासदार चंदन सिंह जेडीयूमध्ये दाखल होऊ शकतात.
२०१९ मध्ये लोकजनशक्ती पार्टीचे सहा खासदार जिंकले होते. गतवर्षी लोकजनशक्ती पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर पारस यांच्यासोबत पाच खासदार आले होते. तर चिराग पासवान एकटे राहिले होते. आता जमुईमधील खासदार चिराग पासवान, हाजिपूर येथून खासदार असलेले पशुपती पारस आणि समस्तीपूर येथून खासदार असलेले प्रिंस हे एकाच कुटुंबातील ३ खासदार वगळता उर्वरित खासदारा एनडीए सोडण्याची शक्यता आहे.