नवी दिल्ली : मणिपूरमधील क्रूरता अन् हिंसाचाराची आग देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. मणिपूरमधील सद्य परिस्थितीवरून चांगलेच राजकारण तापले असून विरोधक सत्ताधारी भाजपावर सडकून टीका करत आहेत. ईशान्येकडील राज्य असलेल्या मणिपुरात भाजपाची सत्ता आहे, पण हिंसाचार आणि महिलांवरचे अत्याचार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले. यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असतानाच बिहारमधील भाजपा प्रवक्त्याने देखील या घटनेच्या या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथे जागोजागी पोस्टर लावून विनोद शर्मा यांनी भाजपातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विविध प्रश्नांची विचारणा करत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. मणिपूरमधील घटनेवर आतापर्यंत पंतप्रधानांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याचे कामही झालेले नाही, असे या होर्डिंगमध्ये नमूद आहे.
पाटण्यात पोस्टरबाजी
भाजपा प्रवक्ते विनोद शर्मा यांच्या राजीनाम्याशी संबंधित पोस्टर्स पाटण्यातील चौकाचौकात लावण्यात आले आहेत. तेथील महिला महाविद्यालयासमोर, लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालयासमोर, जेडीयू कार्यालयासमोर, विधानसभेच्या गेटसमोर, आणि इतर चौकांमध्ये हे बॅनर लावण्यात आले होते.
त्यांनी पत्राद्वारे म्हटले, "मणिपूरमध्ये महिलांची रस्त्यावर नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. मणिपूरमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री असून त्यांनी ८० दिवस कोणतीही कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांनी बडतर्फ केले नाही, यामुळे भारताचा संपूर्ण जगात चेहरा कलंकित झाला. मी माझ्या सर्व पदांचा आणि पक्षाचा राजीनामा देत आहे. भारतीय सनातन संस्कृतीचे रक्षण करणार्या भाजपामध्ये काम केल्याचे मला वाईट वाटत आहे. पंतप्रधान मोदींमध्ये थोडीही माणुसकी असती तर त्यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना तातडीने हटवले असते किंवा स्वतः पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असता."