Bihar Board Exams 2022: बिहार बोर्डाच्या इंटर परीक्षा सुरू झाल्या आहेत. परंतु परीक्षेला दोन दिवसही उलटले नाही तोच शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार समोर आलाय. पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाला योग्यरित्या परीक्षा पार पाडता आल्या नाहीत. इंटरमिजिएटच्या वार्षिक परीक्षेत मोठ्या निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण किशोर कॉलेज मोतिहारी परीक्षा केंद्राशी संबंधित आहे. या ठिकाणी मुलांनी रात्री ८ वाजेपर्यंत परीक्षा दिली होती. इतकंच नव्हे, तर परीक्षेची व्यवस्थाही इतकी चांगली होती की वाहनांचे हेडलाइट्स लाऊन आणि जनरेटर भाड्याने घेऊन परीक्षा केंद्रावर प्रकाश दिला गेला.
महाराजा हरेंद्र किशोर कॉलेज मोतिहारी परीक्षा केंद्रावर दुसऱ्या सत्राच्या परीक्षेत मंगळवारी दुपारी साडेचार वाजेपर्यंतही परीक्षार्थींना उत्तरपत्रिका देण्यात आल्या नाहीत. दुसऱ्या सत्रामध्ये हिंदीची परीक्षा होती. वेळ निघून गेल्याचे पाहून परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ घातला. यानंतर मोतिहारीचे एसडीओ, डीएसपी यांच्यासह तीन पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्याठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, दुपारी साडेचारनंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका देण्यात आल्या आणि रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी वाहनांच्या आणि जनरेटरच्या हेडलाइटमध्ये हिंदीचा पेपर दिला. तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा सायंकाळी ५ वाजता संपणार होती.
बिहार बोर्डाची १२ वीची परीक्षा सुरू झाली असून दोन सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा सकाळी ९:३० ते दुपारी १२:४५ आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षा १:४५ ते ५ या वेळेत घेतल्या जात आहेत. दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.