Bihar Bridge news: बिहारमध्ये अनेक पूल कोसळल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. यावरुन राज्यातील राजकारणही तापले आहे. आता बिहारमधून एका अनोख्या पुलाच्या बांधकामाची माहिती समोर आली आहे, ज्याने सर्वांना चकीतच केले नाही, तर देशातील भ्रष्टाचार किती खोलवर पसरलेला आहे, हे दाखवून दिले आहे.
तुम्ही आतापर्यंत नदी, नाले, तलाव, रस्ता किंवा दरी...यावरुन ये-जा करण्यासाठी पूल उभारल्याचे पाहिले असेल. पण, बिहारच्या अररिया जिल्ह्यातील परमानंदपूर गावात चक्क एका शेता करोडो रुपये खर्च करुन पूल बांधण्यात आला. विशेष म्हणजे, या पूलाखालीन ना नदी वाहते, ना रस्ता जातो. शेताच्या मधोमध कायमस्वरुपी पूल बांधल्यामुळे देशभरात या पूलाची चर्चा होत आहे.
या पूलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात याची चर्चा सुरू झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सरकारी पैशांचा अपहार करण्यासाठी हा पूल बांधण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्ररणाची दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सूमारे तीन कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल ज्या ठिकाणी बांधला आहे, त्या ठिकाणी ना नदी, नाला किंवा रस्ता नाही. पण बिहार सरकारचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी पूल बांधला तिथे मोठा नाला आहे. व्हिडिओ काढला तेव्हा नाल्यात पाणी नव्हते. हा पूल सुमारे 3 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा प्रमुख भाग असून, आजूबाजूचे काम होल्डवर पडले आहे. आणखी एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, स्थानिकांनी खाजगी जमीन असल्याचा दावा करून कामात अडथळा आणला आहे.