नवी दिल्ली - बिहारमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजून अंत्यसंस्कार करण्यात आले होते, ती व्यक्ती तब्बल 30 वर्षांनी आपल्या गावी परतला. त्याला पाहून कुटुंबीयांना विश्वासच बसला नाही. शेवटी पत्नीने तीळ पाहून त्याची ओळख पटवली. ही घटना बक्सर जिल्ह्यातील कोरानसराय गावातील आहे. गावातील घनश्याम तेली 30 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. तो बक्सरच्या बस स्टँडवरुन बेपत्ता झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झाल्यावर कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला होता, मात्र तो सापडला नाही. शेवटी त्याला मृत समजून कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते. बेपत्ता झालेला तरुण अचानक गावी परतल्याने गावकरीही हैराण झाले आहेत. मात्र घनश्याम तेली यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते काहीच बोलू शकत नाहीत. त्यांचं वयही 55 हून जास्त झाली आहे.
घनश्याम तेली परतल्यामुळे त्यांची पत्नी मुन्नी देवी खूप आनंदात आहे. गावकऱ्यांनी घनश्याम तेली आणि मुन्नी देवी यांचं पुन्हा लग्न लावून दिलं. धुमधडाक्यात दोघांचं लग्न करण्यात आलं. जेवणदेखील ठेवण्यात आलं. मुन्नी देवीने सांगितलं की, 30 वर्षांपूर्वी पती बेपत्ता झाला होता. त्यावेळी त्यांना एक मुलगाही होता. तर त्यावेळी मुन्नी देवी गर्भवती होती. 10 वर्षांपूर्वी तिच्या सासऱ्याच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू झाल्याचं समजून दोघांवर एकत्रच अंत्यसंस्कार आणि श्राद्ध करण्यात आलं होतं.
19 जुलै रोजी पोलीस ठाण्यातून अचानक फोन आला की, तिचे पती सापडले. हे ऐकून सुरुवातीला तर तिला धक्काच बसला. यानंतर मुलगा आणि जावयाला घेऊन ती पोलीस ठाण्यात गेली. येथे पतीच्या डाव्या मांडीवरील तिळावरुन पतीची ओळख पटवली. मुलगा आणि जावयाने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून पतीची ओळख पटवली.
मुन्नी देवीने दिलेल्या माहितीनुसार, पती बेपत्ता झाल्यानंतर त्याला खूप शोधण्यात आलं. यानंतर सासरची मंडळी आणि गावातील काही लोक तिच्यावरच हत्येचा आरोप लावत होते. पती जेव्हा बेपत्ता झाले तेव्हा त्या 25 वर्षांच्या होत्या. त्यांना दोन मुलंही होते. वडिलांनी तिला दुसरं लग्न करण्यास सांगितलं, मात्र तिने ऐकलं नाही. आता पती अचानक आल्याने तिला खूप आनंदा झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.