पाटणा - नितीश कुमार यांनी साथ सोडल्याने सत्तेबाहेर जावे लागल्याने भाजपाला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या दुसऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. मुझफ्फरपूरमधील कुढनी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपा उमेदवार केदार प्रसाद गुप्ता यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाचे उमेदवार मनोज कुशवाहा यांना ३ हजार ६३२ मतांनी पराभूत केले.
कुढनी मतदारसंघातील विजय हा भाजपासाठी मोठा विजय मानला जात आहे. या निवडणुकीच भाजपाची टक्कर थेटपणे सात पक्षांशी होती. मात्र अटीतटीच्या लढतीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. या मतदारसंघातील मतमोजणी रंगतदार झाली. सुरुवातीच्या ५ फेऱ्यांमध्ये भाजपाने आघाडी घेतली होती. मात्र नवव्या फेरीपासून १८ फेरीपर्यंत जेडीयूचे उमेदवार मनोज कुशवाहा हे आघाडीवर होते. मात्र अखेरच्या फेऱ्यांमध्ये चित्र बदलले आणि शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये भाजपाचे उमेदवार केदार प्रसाद गुप्ता यांचा विजय निश्चित झाला.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सत्तेबाहेर जावे लागलेल्या भाजपासाठी बिहारच्या राजकारणाच्या दृष्टीने ही पोटनिवडणूक महत्त्वपूर्ण होती. नितीश कुमार यांनी राजदकडून ही जागा जेडीयूसाठी मागून घेतली होती. आधीच्या निवडणुकीत या मतदारसंघातून आरजेडीचा विजय झाला होता. त्यामुळे महागठबंधनसाठी ही जागा प्रतिष्ठेची झाली होती. जेडीयूचे सर्व नेते मतदारसंघात ठाण मांडून होते. मात्र अखेरीस महागठबंधनच्या पदरात पराभव पडला आहे.